लाडक्या बहिणींवरची माया आटली; अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न? लाडकी बहीण योजनेतून वगळणार

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. प्राप्तिकर विभागाकडे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थींना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दरवर्षी १ जून ते १ जुलैदरम्यान ई-केवायसी करून लाभार्थींच्या माहितीची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.
नवीन पात्रतेचे नियम लागू
योजनेत सुमारे २ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या असून ११ लाख अर्जांची छाननी आणि आधार जोडणी प्रलंबित आहे. प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, अटींचे उल्लंघन करणाऱ्या ५ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
दुहेरी लाभ घेतल्यास कारवाई
संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हींचा लाभ घेतलेल्या २.३ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या ६.५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेत फक्त ५०० रुपये प्रति महिना मिळणार आहेत.
फेरतपासणी आणि अटींचा कठोर अंमल
अर्जात दिलेली माहिती आणि बँक खात्यातील तफावतीमुळे १६.५ लाख महिलांची जिल्हास्तरावर फेरतपासणी करण्यात येणार आहे. अपात्र आढळलेल्या महिलांना योजनेतून वगळले जाईल.
महिना लाभ वितरण सुधारणा
नवीन लाभार्थींना अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाईल. तसेच योजनेचे पैसे आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वितरित केले जातील.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेतील पारदर्शकता वाढेल आणि अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.