R Babasaheb Ambedkar Jayanti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोनवेळा का बदलले होते आडनाव, काय होते खरे ‘आडनाव’; जाणून घ्या इतिहास

राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजन समाजाच्या उद्धासासाठी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बाबासाहेब म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू येथे झाला होता.
त्यांचे बालपण अत्यंत संघर्षात आणि सामाजिक भेदभावाच्या वातावरणात गेले.
तुम्हाला माहितीये का त्याकाळी बाबासाहेबांना जातीभेदामुळे त्यांचे आडनाव देखील बदलावे लागले. बाबासाहेबांनी त्यावेळी दोन वेळा आपले आडनाव बदलले. चला तर बाबासाहेबांच्या या आडनाव बदलण्याचा प्रवास कसा होता? त्यावेळी अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे त्यांना आपले आडनाव बदलावे लागले, त्याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया…
‘सकपाळ’ ते ‘आंबडवेकर’ होण्याची कहाणी
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) महू या छोट्याशा गावात जन्मलेल्या डॉ. भीमराव आंबेडकरांच्या आईचे नाव भीमाबाई आणि वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ होते. म्हणून, डॉ. भीमराव यांचे मूळ आडनाव सकपाळ होते. त्याकाळी मोठ्याप्रमाणात जातिभेद होत असे. बाबासाहेब महार जातीचे असल्याने लोक त्यांना खालच्या जातीचे मानत. त्यांना अस्पृश्य म्हणून हिणवले जात असे. हेच कारण होते की, त्यांना लहानपणापासूनच भेदभाव आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला.
लहानपणापासूनच हुशार असूनही त्यांना जातीवादी टीकांना तोंड द्यावे लागले. याच कारणास्तव, त्यांचे वडील रामजी यांनी त्यांना शाळेत दाखल करताना त्यांचे आडनाव सकपाळ ऐवजी ‘आंबडवेकर’ असे केले. ‘आंबडवेकर’ हे आडनाव देण्यामागे कारण त्यांचे गाव होते. खरेतर, ते कोकणातील ‘आंबडवे’ या गावचे होते. म्हणून त्यांनी गावाच्या नावावरुन ‘आंबडवेकर’ असे आडनाव केले. मग त्यांचे नाव भीमराव आंबडवेकर असे लिहिले गेले. संघर्षाचे अनेक टप्पे पार केल्यानंतर अखेरीस बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर या नावाने सुपरिचित झाले.
अशाप्रकारे ‘आंबडवेकर’ ‘आंबेडकर’ झाले
भीमराव आंबडवेकरांच्या नावापुढे आंबेडकर जोडण्याची कहाणी शाळेच्या काळातील आहे. बाबासाहेब अभ्यासात खूप हुशार होते. या गुणामुळे, शाळेतील शिक्षक कृष्ण महादेव आंबेडकर यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. कृष्ण महादेव आंबेडकर हे ब्राह्मण होते. विशेष प्रेमामुळे, शिक्षक कृष्णा महादेव आंबेडकर यांनी भीमरावांच्या आंबडवेकर या आडनावाऐवजी ‘आंबेडकर’ असे लिहिले. अशाप्रकारे बाबासाहेबांचे नाव भीमराव आंबेडकर झाले. तेव्हापासून त्यांना आंबेडकर या आडनावाने हाक मारली जाऊ लागली.
ते देशाचे पहिले कायदा मंत्री बनले
शिक्षणाचा प्रारंभिक टप्पा डॉ. भीमराव आंबेडकरांसाठी सोपा नव्हता, त्यांना जातीभेदाशी झुंजावे लागले. खालच्या जातीचे असल्या कारणाने त्यांना अनेक वेळा वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले. हा भेदभाव केवळ शाळेतपुरताच मर्यादित राहिला नाही. पुढे त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यापासूनही रोखण्यात आले. या भेदभावामुळे त्यांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागला.
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान
अत्यंत कमी वयात त्यांना भेदभाव आणि सामाजिक दुराव्याचा सामना करावा लागला. लहानपणापासून हुशार असूनही त्यांना जातिवादी अपशब्दांना सामोरे जावे लागले. मात्र बाबासाहेबांनी या विपरित परिस्थितीचा निकराने सामना करत जातिनिर्मूलनासाठी काम केले. बहुजन समाजाचा उद्धार हेच त्यावेळी बाबासाहेबांचे ध्येय बनले होते. पुढे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेब देशाचे पहिले कायदामंत्री बनले. देशाची राज्यघटना बनवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. बाबासाहेब देशाच्या राज्यघटनेचे (Constitution) शिल्पकार ठरले.