पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयत ऑनलाइन जन्म-मृत्यू नोंदणी प्रणाली ठप्प; नागरिकांची गैरसोय
पुणे: केंद्र सरकारकडून दिलेली ऑनलाइन जन्म-मृत्यू नोंदणी प्रणाली बंद पडल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रणालीत तांत्रिक अडचणी येत असून, नागरिकांना आवश्यक दाखले मिळवण्यासाठी येरवडा क्षेत्र कार्यालयच्या नागरी सुविधा केंद्रांवर खेटे मारावे लागत आहेत.
२०१९ पासून पुणे महापालिकेत केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी सॉफ्टवेअरद्वारे (सीआरएस) जन्म-मृत्यू नोंदणी केली जात आहे. यापूर्वी महापालिकेची स्वतःची प्रणाली होती, मात्र देशभर एकसारखी सेवा देण्यासाठी केंद्र सरकारने सीआरएस प्रणाली लागू केली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रणालीत सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे नागरिकांना आता ज्या क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी झाली आहे, त्याच कार्यालयातूनच दाखला मिळतो. यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत, कारण अनेक वेळा नागरिकांना दूरवरच्या कार्यालयांत चक्कर मारावी लागते.
त्यातच, ही प्रणाली वारंवार बंद पडत असल्याने दाखल्यांसाठी नागरी सुविधा केंद्रांवर लांब रांगा लागत आहेत. नवीन नोंदणी प्रक्रियाही अत्यंत धीम्या गतीने होत आहे, ज्यामुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने दोन आठवड्यांपूर्वी राज्य शासनाशी बैठक घेतली होती, ज्यात डॉक्टर्स आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अडचणींबाबत तक्रारी मांडल्या होत्या. मात्र, अद्याप कोणतेही सुधारात्मक पावले उचलली गेली नाहीत. आज पुन्हा पुणे महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील यंत्रणा ठप्प झाली, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. महापालिकेकडून या समस्येची लेखी तक्रार राज्य शासनाला पाठवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
good news
Nice