पुणे: महापालिकेचा इशारा: नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई ; खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम: ८५० रुग्णालयांची चौकशी पूर्ण; महाराष्ट्र नर्सिंग ॲक्टच्या अंमलबजावणीत रुग्णालये अपयशी; तपासणी अहवाल राज्य सरकारकडे

खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात महापालिकेचे कडक पाऊल
पुणे: खासगी रुग्णालयांमधील उपचार दरांच्या पारदर्शकतेसाठी पुणे महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, या नियमाकडे २२ खासगी रुग्णालयांनी दुर्लक्ष करत नियमांचे उल्लंघन केले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तपासणीत या रुग्णालयांनी दरपत्रक, रुग्ण हक्कांची सनद, तसेच तक्रार निवारणासाठी ‘टोल फ्री’ क्रमांक लावले नसल्याचे आढळले आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे.
८५० रुग्णालयांची तपासणी, विशेष पथके तैनात
आरोग्य विभागाने राज्यभरातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तपासणीसाठी १५ पथके नेमण्यात आली असून आतापर्यंत ८५० रुग्णालयांची तपासणी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र नर्सिंग ॲक्टची अंमलबजावणी गरजेची
‘महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट’नुसार खासगी रुग्णालयांनी उपचाराचे दरपत्रक व रुग्ण हक्कांची सनद स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे रुग्णालयांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.