पुणे : धक्कादायक! लाडक्या नव्हे मारक्या बहिणी; माजी नगरसेवकाला सुपारी देऊन संपवलं, हत्येचा CCTV आला समोर, VIDEO

66d57aca69590-vanraj-andekar-murder-case-024353459-16x9.jpeg

पुणे, जे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, ते पुन्हा एकदा गुन्हेगारीमुळे चर्चेत आले आहे. पुण्यातील नाना पेठमधील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे.

1 सप्टेंबर, रविवारी रात्री नऊ वाजता वनराज आंदेकर आपल्या घराजवळ उभे असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर कोयत्याने वार करून त्यांना जागीच ठार केले. हा सारा प्रकार नाना पेठेतील डोके तालीमजवळ घडला. चार-पाच दुचाकींवर आलेल्या दहा ते बारा हल्लेखोरांनी वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे.

पहा व्हिडिओ

Link source: loksatta

वनराज आंदेकर यांचे वडील, बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, हे पुण्यातील कुख्यात गुंड आहेत. नाना पेठेतील आंदेकर टोळीचा प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, मात्र जानेवारीमध्ये तो जामीनावर बाहेर आला. बंडू आंदेकर याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. संपत्तीच्या वादातूनच वनराज यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या खुनाच्या कटात त्यांच्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा सहभाग होता. पुण्याचे शहर आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे की, वनराज आंदेकर यांच्या मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर, तसेच त्यांच्या बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

वनराज आंदेकर आणि त्यांच्या बहिणी यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. गणेश कोमकरला नाना पेठेत एक दुकान दिले गेले होते, मात्र महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत ते दुकान पाडले गेले. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. गणेश कोमकरनेही आपली गँग तयार केली होती आणि आंदेकर यांच्या नावाचा फायदा घेत गुंडगिरी सुरू केली होती. एका भांडणाच्या वेळी गणेश कोमकरला मारहाण झाली होती, आणि त्या रागातून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला होता. यादरम्यान वनराज यांच्या बहिणीने त्यांना धमकी दिली होती की ती पोरं बोलवून त्यांना ठोकून काढेल.

या घरगुती वादातूनच सख्या बहिणींनी आपल्या भावाचा खून करण्याचा कट रचला. जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांनी सोमनाथ गायकवाड याला वनराज आंदेकर यांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. रविवारी संध्याकाळी आंदेकर यांच्या घरात कौटुंबिक कार्यक्रम झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास वनराज आपल्या चुलत भावासह खाली उभे असताना, अचानक दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर काहींनी कोयत्याने हल्ला करून त्यांना ठार केले.

दरम्यान, वनराज आंदेकर यांचे वडील बंडू आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, वनराज यांच्या दोन बहिणी आणि त्यांच्या पतींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Spread the love

You may have missed