पुणे: ‘ड्राय डे’ला मध्यवर्ती भागात दारू विक्री; मटका किंगसह तिघांवर गुन्हा, लाखोंचा साठा जप्त

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २७) संपूर्ण पुणे जिल्ह्यात ‘ड्राय डे’ घोषित केला होता. मात्र, आदेशाला धाब्यावर बसवत शहराच्या मध्यवर्ती भागात दारू विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.
शुक्रवार पेठेतील शाहू चौकाजवळील रोनक बारच्या पाठीमागे दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच खडक पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत वैभव विजय डोंगरे (२६), गुड्डू कुमार भोलाकुमार (२६) यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून कुख्यात मटका किंग नंदू नाईक याचे नाव पुढे आले आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या छाप्यातून देशी-विदेशी दारूच्या शेकडो बाटल्या, रोख रक्कम व मोबाईल फोन असा तब्बल १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस चौकशीत आरोपींनी नंदू नाईकच्या सांगण्यावरून दारू विक्री करत असल्याची कबुली दिली आहे.
गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचे आदेश काढले होते. तरीही मध्यवर्ती भागात उघडपणे दारू विक्री सुरू असल्याचे चित्र समोर आले, ही बाब प्रशासनाच्या अंमलबजावणी क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पोलीस यंत्रणा दक्षतेने काम करत असली तरी शहरातील काही ‘प्रभावी’ गुन्हेगारांच्या छत्रछायेखाली अवैध धंदे सुरूच असल्याचे दिसून येते.
परिमंडळ एकचे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण व पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई प्रशंसनीय असली, तरी गणेशोत्सव काळात अशा प्रकारे दारू विक्री धाडसाने सुरू राहणे हे कायद्याला व पोलिसांच्या उपस्थितीला सरळसरळ आव्हान असल्याचे स्पष्ट होते.
टिप्पणी :
गणेशोत्सव काळात नागरिकांकडून शिस्त व संयमाची अपेक्षा केली जाते, पण दुसरीकडे कायद्याला डावलून दारू विक्री केली जाते, ही दुर्दैवी बाब आहे. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करणे ही एक बाब असली तरी, त्यामागील राक्षसी छत्रछाया उध्वस्त करणे हेच खरी परीक्षा ठरणार आहे. अन्यथा ‘ड्राय डे’ फक्त कागदावर राहील, आणि उत्सव काळात शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागण्याचा धोका कायम राहील.
—