पुणे: रविवारी रात्री अचानक पावसाने पुण्यातील रस्त्यांवर ‘नदी’
पुण्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून अवघ्या काही मिनिटांतच रस्त्यांनी नद्यांचे रूप घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणेकर उकाड्याचा सामना करत होते. रविवारच्या रात्री, साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे अनेक नागरिकांची घाईगडबड झाली.
सकाळपासूनच हवेत ऑक्टोबर हीटसारखी उष्णता जाणवत होती, आणि दुपारी वातावरण ढगाळ झाले होते. नऊच्या सुमारास अचानक पावसाचा जोर वाढला. पुण्यातील कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, आणि बोपोडी या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरू झाले आहेत. काही भागांमध्ये ढगफुटीसारख्या परिस्थितीचा अनुभव येत आहे.
गडगडणाऱ्या ढगांसोबतच विजा कडकडत आहेत आणि पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे. रस्त्यांवर पाणी साचून नद्यांचा आभास निर्माण झाला आहे. रविवार असल्याने बाहेर गेलेल्या लोकांना अचानक आलेल्या पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. कात्रज आणि सिंहगड रस्ता परिसरात वीजपुरवठा खंडित झाला असून येरवड्यातही विजांच्या कडकडाटासोबत पाऊस जोरात सुरू आहे.