पुणे पोलिसांचा ‘सत्कार सोहळा’: बुकेपेक्षा ‘बुजबुज’ जास्त! १०५ कर्मचाऱ्यांसाठी फक्त ३० बुके; तपास फंडाची बिले मात्र वर्षानुवर्षे प्रलंबित

Pune-Police.jpg



पुणे प्रतिनिधी

पुणे पोलिसांनी मोठ्या गाजावाजात उमरटी ऑपरेशन करणाऱ्या १०५ कर्मचाऱ्यांचा सत्कार केला… पण त्या सत्कारातही ‘कंजूसपणा’ ओतप्रोत दिसून आला. कारण साधं—१०५ लोकांसाठी फक्त ३० बुके! तेच बुके स्टेजवरून उतरल्यावर परत काढून पुन्हा दुसऱ्याच्या हातात—एक बुके अनेक सत्कारांचा ‘शेअर’! हा शेअरिंगचा नवा मॉडेल पुणे पोलिसांनी जगाला दाखवला!

तपासासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो, त्यांची बिले वर्षानुवर्षे प्रलंबित… पण पोलीस आयुक्त मात्र पत्रकार परिषदेत सांगतात, “पोलिसांकडे पैशाची कमतरता नाही.” जर खरंच कमी नसेल, तर १०५ कर्मचाऱ्यांसाठी एकेक गुलाब तरी देता आला नसता?

शासनाच्या फंडातून १०५ जणांना मध्य प्रदेशात पाठवलं, मोठी कामगिरी केली… पण त्यांच्या सन्मानात मात्र हात आखडता का घेतला? कारवाईचा गाजावाजा भरपूर, पण बुके मात्र ‘स्वस्ताईचे’. बाजारात १५० ते २०० रुपयांचा बुके… पण पुणे पोलिसांसाठी तोही ‘महाग’.

सत्कार सोहळ्याचा ‘सर्वात मोठा धक्का’ म्हणजे पोलीस मुख्यालयातील उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी फक्त ३० छोट्या बुकेची ऑर्डर दिली होती. स्टेजवर बुके दे, स्टेजखाली बुके परत घे… आणि मग परत त्याच बुकेसह पुढचा सत्कार! कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज—
“हातातला बुके माझा की मागच्याचा?”

तपास फंडाची बिले वर्षानुवर्षे प्रलंबित. अधिकाऱ्यांना स्वतःच्या पैशावर तपास, दौरे, कारवाई. पण त्यांची बिले मंजूर करायला वेळ, कारण टीप… निधी म्हणे ‘लाडकी बहीण योजनेकडे’ वळवला गेल्याची चर्चा! आणि दुसरीकडे पोलीस आयुक्तांचा दावा—“फंडाची कमी नाही.”

प्रश्न एकच—
कमी फंडाचा आहे की कमी मनाचा?

१०५ कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन ऑपरेशन केले. पण त्यांच्या सन्मानात कंजूषपणा?
अमलदारांचा सवाल अचूक—
“जेव्हा म्हणता पैशाची कमी नाही, मग बुकेचेही काटकसरी का?”

पुणे पोलिसांचा हा ‘बुकेगेट’ प्रकार आता शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
सत्कार सोहळा मोठा… पण मानसन्मान मात्र अगदी ‘मिनिमम बजेट’मध्ये!

Spread the love

You may have missed