पुणे: आयुक्तांच्या आदेशांना पोलिसांचे पाठींबा नाही? रामवाडी परिसरात अवैध प्रवासी वाहतूक; पोलिसांवर डोळेझाक केल्याचा आरोप; सिग्नल तोडणाऱ्यांना दंड, पण अवैध वाहनांवर कारवाई शून्य— स्थानिकांचा आरोप
पुणे : वाहतूक पोलिसांनी चौकाचौकांत लपून-दडून केली जाणारी दंडात्मक कारवाई तात्काळ थांबवावी, असा आदेश पोलिस आयुक्तांनी नुकताच जारी केला. मात्र या आदेशानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, याबाबत पुणेकरांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः रामवाडी व खराडवाडी परिसरात वाहतूक नियमांची सुरू असलेली पायमल्ली पाहता नागरिकांच्या नाराजीत आणखी भर पडली आहे.
पहा व्हिडिओ
रामवाडीत ६-सीटर व ३-सीटर रिक्षांची अवैध वाहतूक
रामवाडी मेट्रो स्टेशन शेजारी ६-सीटर आणि ३-सीटर रिक्षांमार्फत प्रवाशांची धोकादायक व अवैध वाहतूक दिवसाढवळ्या सुरू आहे. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांच्या मते, या वाहनांवर आवश्यक ती कारवाई होत नाही. उलट वाहतूक विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून या रिक्षाचालकांकडून हप्ते घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
छुप्या पद्धतीची कारवाई कायम?
नागरिकांचे म्हणणे आहे की, जिथे नियमभंग मोठ्या प्रमाणात होतो, त्याठिकाणी पोलिसांचा वावर कमी असून दुसरीकडे लपून सिग्नल मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात पोलिस गुंतलेले दिसतात. “जिथे खरोखर वाहतूक शिस्त लावण्याची गरज आहे, तिथे पोलीस नसतात. मात्र वसुलीची शक्यता दिसली की तेच तैनात असतात,” असा आरोप नागरिकांनी केला आहे.
अवजड वाहने आणि खासगी बसेसवर कारवाईचा अभाव
खराडी–रामवाडी बायपास परिसरात अवजड बांधकाम वाहने आणि नियम मोडणाऱ्या खासगी प्रवासी बसेसवर कारवाई न झाल्यामुळे स्थानिकांतून रोष व्यक्त होत आहे. “ही वाहने नियमितपणे नियमभंग करतात, पण पोलिसांकडून दखल घेतली जात नाही,” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी होणार का?
छुपी दंडात्मक कारवाई थांबवण्याच्या आदेशानंतर वाहतूक विभागाची कार्यप्रणाली बदलणार का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच पुण्यातील वाहतूक शिस्तीत सकारात्मक बदल होऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलिस खात्याच्या पुढील पावलांवरच वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा अवलंबून राहणार असून, नागरिक मात्र या बदलांकडे आशेने पाहत आहेत.