पुणे: पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली? सर्वत्र अवैध धंद्यांचा सुळसुळाट, पोलिसांची कठोर कारवाई

पुणे : पुणे शहरात अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरु असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध व्यवसाय थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आचार संहिता लागू होताच पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या, ज्यात हातभट्टी दारु विक्री, मटका, जुगार अशा बेकायदा व्यवसायांचे जाळे उघड झाले.
शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकत बेकायदा दारु आणि जुगार अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यात प्रसिद्ध मटका किंग नंदू नाईक आणि त्याच्या साथीदारांना अटक करून लाखो रुपयांची रोकड आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
खडक पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील शुक्रवार पेठेतील एका बारच्या वरच्या मजल्यावर मटका जुगार खेळत असलेल्या चौघांना पकडण्यात आले. आरोपींच्या कडून ३१०५ रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच रास्ता पेठ आणि पुणे स्टेशन रोडवरही बंडगार्डन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये काही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवार पेठेतील जनसेवा इमारतीच्या टेरसवरील नंदू नाईक याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ६० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, तिथे तब्बल १ लाख रुपयांची रोकड सापडली आहे.
पोलीस विभागाने केलेल्या या कठोर कारवाईने पुणे शहरातील बेकायदा धंद्यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न सुरु असून, पुढील काळात अशा कारवायांचा वेग वाढवण्याची शक्यता आहे.