पुणे: १२५ बांधकामांना नोटिसा, महापालिकेची कारवाई कागदावरच?; नोटिसा मिळूनही बांधकामे सुरू; कोण करणार जबाबदारी स्वीकार?

1002846707.jpg

पुणे: शहरात वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या १२५ बांधकामांना पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटिसा जारी केल्या होत्या. मात्र, या नोटिसांनंतर कोणत्याही विकसकाने खुलासा केलेला नाही, आणि बांधकाम विभागाने त्यानंतर पुढील कोणतीही कारवाई न केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बांधकाम करताना धूळ आणि प्रदूषण रोखण्यासाठी एमपीसीबीच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश असूनही शहरातील कोथरूड, बाणेर, बालेवाडी, वारजे माळवाडी, हडपसर, खराडी, येरवडा यांसारख्या भागांतील अनेक बांधकामे नियमांचे उल्लंघन करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने दोन दिवसांत १२५ बांधकामांना काम थांबविण्याची नोटीस दिली होती.

बांधकामांमुळे प्रदूषणाचा धोका

शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि मेट्रो प्रकल्पामुळे गणेशखिंडसारख्या भागांत धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हवा प्रदूषित झाली असून नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांचे विकार आणि हृदयविकारांचा धोका निर्माण झाला आहे.

कारवाई फक्त कागदावरच?

महापालिकेने नोटिसा दिल्यानंतरही किती बांधकामे बंद आहेत याची पडताळणी केलेली नाही. शिवाय, नोटीस मिळालेल्या विकसकांकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर टीका होत आहे. नोटिसा फक्त दिखाव्यापुरत्याच असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

पुढील कारवाईचे संकेत

“नोटिसा दिल्यानंतरही बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर पोलिसांमार्फत कठोर कारवाई केली जाईल,” असे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही होईल, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेचे उदासीन धोरण?

शहरातील वाढत्या प्रदूषणावर प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी बांधकाम विभागाच्या अशा धोरणांमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. नोटिसा फक्त औपचारिकता ठरत असल्याने महापालिकेच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Spread the love

You may have missed