पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्यांची ‘कारवाईतून’ वाचण्यासाठी धडपड ! अधिकार नसताना सहाय्यक आरोग्य प्रमुखांनी लेखा विभागाला पाठविलेली
बिलांची 85 प्रकरणे प्रभारी आरोग्य प्रमुखांनी तातडीने मागवून घेत त्यावर स्वाक्षर्या केल्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC Health Department News | पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारातील सुरस गोष्टी अद्यापही सुरू आहेत. बिलांवर आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखच स्वाक्षर्या करत असल्याची बाब उघडकीस आल्याची चौकशी सुरू झाली आहे. यामुळे अवघ्या दीड महिन्यापुर्वी आरोग्य प्रमुखाचा तात्पुरता पदभार स्वीकारलेल्या उपआरोग्य प्रमुखांनी त्यांच्या कार्यकाळात लेखा विभागाकडे गेलेल्या तब्बल ८५ फाईल्स परत मागवून घेत त्यावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये मागील वर्षभरापासून बिलांवर आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखच स्वाक्षर्या करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. यापुर्वीचे तीनही आरोग्य प्रमुख शासकिय सेवेतील होते. प्रत्यक्षात तीन लाख रुपयांवरील सर्वच बिलांवर आरोग्य प्रमुखांनी अंतिम स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. विशेष असे की, सहाय्यक आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षरीने आलेली बिले लेखा विभागांकडून मान्यही करण्यात आली आहेत. या बिलांमध्ये औषधं व उपचार साधनांची खरेदी, शहरी गरीब व अंशदायी योजनेतील खाजगी हॉस्पीटल्सना अदा करायच्या बिलांचाही समावेश आहे.
दरम्यान यासंदर्भातील तक्रारी आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तर त्याचवेळी प्रत्येक बिलांवर आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्या देखिल बंधनकारक केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी त्यांच्या कार्यकाळातील सहाय्यक आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षरीने लेखा विभागाकडे दाखल केलेल्या तब्बल ८५ फाईल्स पुन्हा मागवून घेतल्या. या बिलांवर तातडीने त्यांच्याही स्वाक्षरी करून पुन्हा लेखा विभागाकडे पाठविल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर फाईल्सच्या पळवापळवीची सुरस चर्चा संध्याकाळी महापालिका वर्तुळात रंगली होती.
अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार बिलांच्या फाईल्सवर आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्या करण्यासाठी लेखा विभागाकडून माझ्या कार्यकाळातील फाईल्स मागवून घेतल्या. त्यांची तपासणी करून स्वाक्षर्या करून त्या पुन्हा लेखा विभागाकडे पाठविण्यात येत आहेत.
– डॉ. कल्पना बळीवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख (Dr Kalpana Baliwant)
बिलांवर विभागप्रमुखांच्या स्वाक्षर्या असणे बंधनकारक आहे. आरोग्य विभागाकडून येणार्या मॅन्युअल बिलांवर (ससा) आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्या आहेत. परंतू सॅप सिस्टिममधून येणार्या बिलांवर त्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आरोग्य प्रमुखांनी केलेल्या मागणीनुसार बिलांच्या ८५ फाईल्स त्यांना परत पाठविल्या आहेत. ही बिले अद्याप संबधितांना दिलेली (पेड केलेली) नाहीत.
• उल्का कळसकर, मुख्य लेखापाल, पुणे
महापालिका (Ulka Kalaskar)
Link source: Pune.news