पुणे : महापालिकेचे आदेश कडक, पण अंमलबजावणी ढिलीच! अनधिकृत फ्लेक्सवर सहायक आयुक्त जबाबदार ठरवणार, पण शहर अजूनही ‘फ्लेक्सनगर’च

0
IMG_20251114_133416.jpg

पुण्यात अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड आणि बॅनर यांचे साम्राज्य थाटून बसले असताना महापालिका अखेर झोपेतून उठल्यासारखी दिसत आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी आता लेखी आदेश काढून “अनधिकृत फ्लेक्स दिसला तर सहायक आयुक्त जबाबदार!” अशी घोषणा केली आहे. पण नागरिकांचा प्रश्न एकच — फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई कधी आणि किती?

शहरात जाहिरातीसाठी महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते, पण ती घेण्याचे सोडाच, अनेकांना तिचे अस्तित्वही आठवत नसल्यासारखे वर्तन आहे. वाढदिवस, सण, कार्यक्रम—कशालाही परवानगीची गरज वाटत नाही. विद्युत खांब, सिग्नल, चौक… कुठेही नजर फिरवा, फ्लेक्सचं ‘जंगल’ दिसतं. आणि त्यात काही फ्लेक्स तर इतक्या धोकादायक पद्धतीने उभारलेले की, नागरिकांच्या सुरक्षेचाही रामभरोसा.

महापालिका म्हणते, “आम्ही कारवाई करतो!” पण कारवाईला राजकीय दबावाचे ‘ब्रेक’ बसतात, हे सर्वांना ठाऊक. फ्लेक्स उतरवले तरी लोखंडी व बांबूचे सांगाडे जाग्यावरच राहतात आणि त्याच्यावर लगेच नवा फ्लेक्स चढतो — म्हणजे कारवाई की कॉमेडी?
शहराचे विद्रूपीकरण आणि महापालिकेचे उत्पन्न, दोन्हीही या फ्लेक्स संस्कृतीमुळे बुडत आहे.

आयुक्तांनी आता आदेश दिले आहेत —

  • अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांकडून प्रतिनग 1000 रुपये दंड वसूल करा.
  • कारवाईचा पूर्ण खर्च वसूल करा.
  • पोलिसांत गुन्हा दाखल करा.
  • फ्लेक्स छापणाऱ्या व्यावसायिकांच्या परवान्यांचीही तपासणी करा.

परंतु शहरवासीयांना शंका एकच :
आदेश कागदावरच राहणार की खरोखरच फ्लेक्समुक्त पुणे कधी दिसणार?

कारण खरा प्रश्न फ्लेक्सचा नाही…
प्रश्न आहे, कारवाईचा फ्लेक्स कोण काढणार?

Spread the love

Leave a Reply

You may have missed