पुणे: भवनरचना विभागातील बदल्यांवरून महापालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; पदोन्नती मिळाल्यावरही ‘तेच खाते’, ‘तेच जबाबदारी’; नियोजन शून्य? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

पुणे प्रतिनिधी –
पुणे महानगरपालिकेतील वरिष्ठ अभियांत्रिकी संवर्गातील बदल्यांवरून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्री. एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप झाले असून, पुण्याचे ज्येष्ठ नागरिक रमेश विष्णू खामकर यांनी थेट आयुक्तांकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल करत चौकशीची मागणी केली आहे.
खामकर यांच्या म्हणण्यानुसार, बदल्यांच्या प्रक्रियेत अपारदर्शकता असून त्यात आर्थिक देवाणघेवाणीची शंका उपस्थित होत आहे. त्यांनी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने १८ जुलै २०२५ रोजी पाठवलेल्या पत्राचा संदर्भ देत उपअभियंता सुनिल हंबीरराव मोहिते यांच्या बदल्यांबाबतची माहिती उजेडात आणली आहे.
‘फक्त कागदोपत्री’ बदली?
सुनिल मोहिते यांची २०१९ मध्ये मलनिःसारण विभागातून भवनरचना विभागात बदली झाली होती आणि २०२० मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली. मात्र, प्रत्यक्षात ते वर्ष २०१५ पासून आजपर्यंत भवनरचना विभागातच कार्यरत आहेत, अशी माहिती माहिती अधिकारातून मिळाल्याचा दावा खामकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्यांचे वेतन एक विभागातून तर जबाबदारी दुसऱ्या विभागात दाखवली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
चौकशीला ‘शेऱ्याने’ फाटा?
या बाबत अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले असतानाही, त्यांनी “Matter to be considered later” अशी टिप्पणी करून विषय टाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दुर्लक्षामागे कोणतेही आर्थिक हितसंबंध आहेत काय, असा संशय व्यक्त होत असून, संपूर्ण महापालिकेत याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
बदली आदेश ‘सिंगल ऑर्डर’ पद्धतीने?
७ जुलै २०२५ रोजी महापालिकेतील विविध संवर्गांतील बदल्यांचे आदेश अचानक आणि कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न पाळता जाहीर करण्यात आल्याचे खामकर यांनी नमूद केले. या आदेशांमध्ये कोणतीही मागणी, सेवकांचा अर्ज अथवा गरज याचा उल्लेख न करता एकाच आदेशात बदल्या करण्यात आल्या असून, ते महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.
‘महापालिका आयुक्तांशी बोला’ – नागरिकांशी असंवेदनशीलता?
खामकर यांनी अशीही टीका केली की, नागरिक जेव्हा समस्या घेऊन अतिरिक्त आयुक्तांकडे जातात, तेव्हा त्यांना “महापालिका आयुक्तांशी बोला” असा सल्ला दिला जातो. त्यामुळे, जर सर्व निर्णय आयुक्तच घेणार असतील, तर अतिरिक्त आयुक्तांचे कार्य आणि जबाबदाऱ्या काय, असा प्रश्न निर्माण होतो.
तक्रारीची व्याप्ती वाढतेय
या प्रकरणी रमेश खामकर यांनी फक्त महापालिका आयुक्तांकडेच नव्हे, तर सामान्य प्रशासन विभागातील श्रीमती सविता सूर्यवंशी यांनाही ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, एकाच कर्मचाऱ्याने ११ वर्षे एकाच विभागात कार्यरत राहणे ही गंभीर प्रशासकीय त्रुटी असून, यावर तातडीने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
नागरिकांचा आक्रोश
या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेतील बदल्यांच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये असंतोष वाढला असून, प्रशासनाच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार व्हावी, ही नागरिकांची ठाम मागणी आहे.
पुढील पावले काय असतील, याकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.