पुणे: “जमत नसेल तर सांगा, दुसरे अधिकारी आणू”: अजित पवारांचा पोलिसांना निर्वाणीचा इशारा

पुण्यात गुन्हेगारीचा उधाण: अजित पवार यांची पोलिसांना तंबी
पुणे – शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पुण्यातील गुन्हेगारीला जर पोलीस रोखू शकत नसतील, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम सोडावे. आम्ही नवे अधिकारी आणू,” असा इशारा त्यांनी दिला.
महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, “पुण्यात राजकीय हस्तक्षेप नाही. त्यामुळे गुन्हेगारी रोखणे ही पोलीस विभागाची जबाबदारी आहे. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना काम जमले नाही, तर त्यांनी बाजूला व्हावे.”
अजित पवार यांनी सांगितले की, गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या जात आहेत आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल.
पीएमपीसाठी 200 नवीन बस
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पीएमपीच्या ताफ्यात लवकरच 200 नवीन बस दाखल होणार आहेत. आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टाटाच्या या बसमुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.
साखर कारखान्यांसाठी पुढाकार
शिरूर येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीही उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. “साखर कारखान्यांमध्ये राजकारण न करता त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे पवार म्हणाले.
शहराच्या सुरक्षेसाठी निर्णायक पावले
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावी, असा आग्रह अजित पवार यांनी धरला आहे. गुन्हेगारी रोखण्यात अपयश आले तर बदल अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.