पुणे: बावधनजवळ हेलिकॉप्टर अपघात: तीन जणांचा मृत्यू, धुक्यामुळे दुर्घटना? – व्हिडिओ
पुण्याच्या बावधनजवळ बुधवारी (2 ऑक्टोबर) सकाळी पावणे सातच्या सुमारास एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले, ज्यामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मुंबईकडे निघाले होते हेलिकॉप्टर
हे हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून मुंबईकडे निघाले होते. मात्र दाट धुक्यामुळे ते अपघातग्रस्त झाले असावे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. दुर्घटनास्थळावर हेलिकॉप्टरचे काही भाग जळाल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
अपघात दुर्गम ठिकाणी
अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी आल्यामुळे मदत पोहोचण्यासाठी दीड तास लागला. डोंगराळ भागात झालेल्या या अपघातानंतर अग्निशामन दलाच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी मृतदेह बाहेर काढले असून, अधिक प्रवासी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दाट धुक्याचे संकट
पुण्यात आणि मुंबईत सकाळपासूनच दाट धुके पसरले होते. या धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धुक्याचे प्रमाण इतके होते की सकाळी दहापर्यंत देखील ते कमी झालेले नव्हते. अपघाताची नेमकी कारणे तपासण्यासाठी अधिकृत चौकशी सुरू आहे.