पुणे: येरवडा येथील यादव सर्व्हिस स्टेशनवर ग्राहकांचा अपमान – व्यवस्थापकाची अरेरावी, नागरिकांत संताप

पुणे, येरवडा – शहरातील येरवडा परिसरातील यादव सर्व्हिस स्टेशन या पेट्रोल पंपावर एका प्रामाणिक आणि दीर्घकालीन ग्राहकासोबत झालेल्या उद्धट वागणुकीमुळे संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक रहिवासी मोईन चौधरी, हे गेल्या १०-१२ वर्षांपासून या पंपाचे नियमित ग्राहक असून त्यांनी एका साध्या विनंतीवरून झालेल्या अपमानास्पद अनुभवाची गंभीर तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मोईन चौधरी हे आपल्या दुचाकीत दीड लिटर पेट्रोल भरण्यासाठी यादव सर्व्हिस स्टेशनवर गेले असता, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अत्यंत उद्धट आणि अवमानकारक भाषेत वागणूक दिली. “इथे लिटरमध्ये पेट्रोल मिळणार नाही, हवं असेल तर टाका, नाहीतर निघून जा,” असे स्पष्ट शब्दांत त्यांना झिडकारले गेले. या प्रकारानंतर त्यांनी व्यवस्थापक विठ्ठल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडूनही तितक्याच उद्धटपणाने, “पेट्रोल पाहिजे असेल तर रुपयात घ्या, नाहीतर दुसऱ्या पंपावर जा,” अशी थेट सूचना मिळाली.
“मी गेल्या अनेक वर्षांपासून या पंपाचा ग्राहक असून, एक लिटरमध्ये पेट्रोल मागितल्यावर असा अपमान होईल, हे मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं,” असे चौधरी यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केले.
पेट्रोल पंपावरील व्यवस्थापन आणि सेवांबाबत त्यांनी पुढील गंभीर त्रुटींचाही पाढा वाचला आहे:
संध्याकाळी ७ वाजल्यानंतर मोफत हवा बंद केली जाते
टॉयलेट सुविधा अतिशय घाण व दुर्गंधीयुक्त
कर्मचारी आणि व्यवस्थापक गणवेशात नसतात, शिस्त अभाव
पावती मागितल्याशिवाय दिली जात नाही
पेट्रोलमध्ये भेसळ आणि मोजमापात फसवणूक असल्याची नागरिकांमध्ये चर्चा
पंप वेळेच्या आधी बंद होतो, वेळेचा फलक अदृश्य
नोझल आणि मशीनची देखभाल अपुरी
ग्राहकांशी अरेरावीची वागणूक सातत्याने
या सर्व मुद्द्यांची दखल घेत चौधरी यांनी ही तक्रार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, जिल्हाधिकारी, अन्न व नागरी पुरवठा विभाग, वजन व माप कार्यालय यांच्याकडे केली आहे. याशिवाय, त्यांनी ही माहिती विविध प्रमुख वृत्तपत्रे आणि माध्यमांकडेही दिली आहे.
“ही तक्रार फक्त माझी नाही, ती प्रत्येक प्रामाणिक ग्राहकाच्या सन्मानासाठी आहे,” असे सांगून चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ ऑडिट करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइलकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.