पूणे: येरवड्यातील अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू, मुलगी जखमी; अपघात करून पसार झालेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
IMG_20250416_014748.jpg

पुणे : येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने दिलेल्या धडकेत एका अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, त्याच्या सोबत असलेली एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (14 एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

या अपघातात अली मोहम्मद शेख (वय 14, रा. अल कुरेश हॉटेलमागे, कामराजनगर, येरवडा) या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या सोबत असलेली हजरा मुजफ्फर अन्सारी (वय 12) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अलीचे वडील मोहम्मद गुलाब शेख (वय 40) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली आणि हजरा हे दोघे जलतरण तलावात पोहण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी गोल्फ क्लब चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अलीचा मृत्यू झाला.

अपघातानंतर मोटारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. येरवडा पोलीस घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केकाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed