पुणे शहरः ५० टक्के अधिछात्रवृत्ती देणाऱ्या निर्णयाविरोधात बार्टी कार्यालयासमोर विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न – व्हिडिओ
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कार्यालयाबाहेर उपोषण करत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून हा प्रयत्न अयशस्वी ठरवला आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मागील अडीच वर्षांपासून अधिछात्रवृत्ती मिळालेली नाही, त्यामुळे ते त्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मते, या आंदोलनामुळे अद्याप कोणतीही सकारात्मक हालचाल झालेली नाही आणि शासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे.
माहितीनुसार, बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात ५ ऑगस्टपासून बार्टीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. २०२२ च्या एका संशोधक विद्यार्थ्याने १०० टक्के अधिछात्रवृत्ती हा त्यांचा हक्क असल्याचा दावा करत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. हा विद्यार्थी गरीब कुटुंबातील असून मित्रांकडून कर्ज घेऊन पीएच.डी.चे शिक्षण घेत आहे.
अधिछात्रवृत्ती मिळण्यास विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. २५ जुलै २०२४ रोजी शासनाने निर्णय प्रसिद्ध केला की, बार्टी, सारथी आणि महाज्योती या तीन संस्थांमधील विद्यार्थ्यांना ५० टक्केच अधिछात्रवृत्ती मिळणार आहे.
कृती समितीने सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेण्याची मागणी केली आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बैठक ठरली नाही तर अनेक विद्यार्थी असेच आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतील, असे अधिछात्रवृत्ती विभाग प्रमुख अनिल कारंडे यांनी सांगितले आहे.