पुणे शहर : … तर सहा महिन्यांसाठी गाड्या जप्त करा, पायी गस्त घाला, वचक ठेवा; पोलीस आयुक्त वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांवर कडाडले
पुणे : शहराच्या हडसपर, रामटेकडी, वानवडी, भैरोबा नाला परिसर, रास्ता पेठ, बिबवेवाडी भारती विद्यापीठ, पद्मावती आदी भागात जुन्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या विक्रीचे पेव फुटले आहे. थेट पदपथावरच या चारचाकी व दुचाकी गाड्या लावून ‘फॉर सेल’ असे फलक लावत पदपथ अडवले जात आहेत.
त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालत जावे लागते. अनेकदा वाहनांची धडक बसल्याने किरकोळ तसेच गंभीर अपघात घडतात. याची दखल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली असून याविषयी कारवाई करण्याचे आदेश वाहतूक निरीक्षकांना दिले आहेत. जर, कोणी ऐकत नसेल तर त्याच्या गाड्या सहा महिन्यांसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, केवळ वाहनांमधून फिरण्यापेक्षा पायी गस्त घालण्याबाबत देखील त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) हे सध्या विविध पोलीस ठाण्यांना भेट देऊन पाहणी करीत आहेत. तीन महिन्यापासून एक मुलगा बेपत्ता आहे. त्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी आयुक्तांनी भारती विद्यापीठ परिसरात पायी फिरून पाहणी केली. काही नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते सहकारनगर परिसरात असल्या पद्मावती येथे आले. त्यावेली त्यांना पदपथावर महागड्या आलीशान गाड्या उभ्या असल्याचे निदर्शनास आले. या गाड्यांवर ‘फॉर सेल’ असे बोर्ड लावलेले होते. थेट पडपथावर गाड्या उभ्या करून गाड्या विक्रीचा बाजार भरलेला त्यांच्या निदर्शनास आला. पादचार्यांचना चालण्यासाठी रस्ताच शिल्लक नव्हता. अवैध पार्किंग करण्यात आल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी तत्काळ वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकार्यां ना बोलावून घेत, याबाबतचा जाब विचारला. ‘तुम्ही तुमच्या हद्दीत काही पाहता की नाही?’ असा जाब त्यांनी विचारला. अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत या गाड्या जप्त करून सहा महिने सोडू नका अशा सूचना केल्या.
यासोबतच शहरातील वाहतूक विभागाचे सर्व निरीक्षक, प्रभारी अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक यांना आपापल्या हद्दीत पायी गस्त घालण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. दररोज किमान पाच ते सहा किलोमीटर पायी गस्त घालण्यात यावी. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या. नागरिकांना न्याय देण्याबाबत जागरूक रहा अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस रस्त्यावर दिसले तर नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल तसेच गुन्ह्यांचे आणि गैरप्रकारांचे प्रमाण कमी होईल असे आयुक्त म्हणाले.
अनेक ठिकाणी हॉटेल चालक ‘वॅलेट पार्किंग’च नावाखाली पदपथावर किंवा रस्त्याच्या कडेला ग्राहकांच्या गाड्या लावतात. मध्यवस्तीम अनेक हॉटेल चालकांनी देखील गल्लीबोळातील रस्त्यावर दुतर्फा गाड्या लावण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिक, खरेदीसाठी बाहेर पडलेले ग्राहक, पादचारी यांना अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलिसांकडून याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जाते.
पोलीस चौकीमध्ये नागरिक तक्रार अगर समस्या घेऊन गेल्यास त्यांची समस्या कशी सोडवता येईल याचा विचार न करता पैसे कसे मिळतील याचा चौकीस्तरावर अधिक विचार केला जातो. त्यामुळे अनेकदा लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलीस चौक्यांचे सक्षमीकरण केले जाणे आवश्यक आहे. पोलीस चौकी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या देखील जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत. चौकी स्तरावर देखील गुन्हेगारांवर वचक आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.