पुणे: बंदी फक्त कागदावर? सेनापती बापट रोडवर ई-सिगारेटची उघडपणे विक्री! 2.40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल
पुणे : शहरात ई-सिगारेट आणि हुक्क्यावर कडक बंदी असल्याचं प्रशासन वारंवार सांगतं, पण प्रत्यक्षात ती फक्त कागदावरच दिसते. सेनापती बापट रोडसारख्या मुख्य भागातच “द शॅक शॉप” नावाचं दुकान बेकायदेशीर ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेव्हर विकत होतं, हे पोलिसांच्या छाप्यात उघड झालं. म्हणजे बंदी असली तरी धुरकट व्यवसाय मात्र जोरात सुरूच!
गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने या दुकानावर धाड टाकून तब्बल ₹2.40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दुकानदार चेतन धर्मराज सावंत (वय 24, रा. चिखली, निगडी) याच्यावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली, पण प्रश्न असा की — एवढ्या गजबजलेल्या भागात इतका काळ हा धंदा चालूच कसा राहिला? पोलिस गस्त फक्त कागदावर होती का?
शहरात वारंवार ई-सिगारेट आणि हुक्का विक्रीविरोधात मोहीम राबवली जाते, पण काही व्यापाऱ्यांना या बंदीचा ना धाक, ना भीती! आरोग्य विभागाचे नियम आणि पोलिस कारवाई हे फक्त दाखवण्यासाठी आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
एकीकडे युवकांच्या आरोग्यासाठी सरकार जाहिराती करतं, तर दुसरीकडे शहराच्या हृदयातच असा ‘धूराचा धंदा’ मोकळेपणाने सुरू असणं — ही प्रशासनाची थेट लाज आहे.