पुणे: अतिक्रमण वाढीला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद; कारवाईत फोलपणा उघड; कसूर करणाऱ्या चार निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई; पुढे कठोर पावले उचलली जाणार

अतिक्रमण विभागाचे १७३९ कारवायांचा दावा; वसुलीत मात्र फक्त तुटपुंजी प्रगती
पुणे: शहरातील वाढत्या अतिक्रमणाला महापालिकेतील अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे अनेकदा समोर आले आहे. कारवाईची माहिती अतिक्रमणधारकांपर्यंत पोहोचवल्याने अतिक्रमण विरोधी मोहिमा निष्फळ ठरत असल्याचा प्रकार महापालिकेने मान्य केला आहे. अतिक्रमण निरीक्षकांचे स्थानिकांशी तयार झालेले लागेबांधे आणि कारवाईतील अपारदर्शकतेमुळे शहरातील समस्या आणखी गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिक्रमण निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. प्रत्येक तीन महिन्यांनी बदल्या केल्या जातील, असा आदेश असूनही प्रशासकीय उदासीनता कायम असल्याची चर्चा आहे. अतिक्रमण विभागाच्या प्रमुख सोमनाथ बनकर यांनी कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय शिस्तभंग केल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चार अतिक्रमण निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
शहरातील मध्यवर्ती पेठा, बाजारपेठा, आणि मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने पदपथ व्यापले गेले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास वाढला आहे. महापालिकेने पाच झोनमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईचे नियोजन केले असले तरी कारवाईपूर्वीच माहिती लीक झाल्याने या मोहिमा निष्फळ ठरल्या आहेत.
महापालिकेची अतिक्रमण कारवाई – केवळ दाखवण्यासाठी?
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १७३९ कारवाया केल्याचा दावा केला असून, ६ लाख ३३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मात्र, एकूण थकबाकी ६० कोटी ४४ लाख रुपये असून, फक्त ३७ लाख ८२ हजार रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. ही आकडेवारी प्रशासनाच्या कारवाईतल्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकते.
अन्नपदार्थ विक्री नियमांची पायमल्ली
नेमून दिलेल्या ठिकाणी पदार्थ शिजवण्यावर बंदी असूनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोर हा प्रकार सुरू आहे. कारवाईचे आदेश असूनही कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. यामुळे महापालिकेचा इशारा फुसका ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
येत्या काळात कठोर पावले उचलली जाणार
“अतिक्रमण विरोधी मोहिमा आणखी तीव्र केल्या जातील. योग्य कारवाई न करणाऱ्या निरीक्षकांवर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल,” अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर यांनी दिली.
कारवाईतून समाधान होणार का?
महापालिकेने अतिक्रमण निरीक्षकांच्या बदल्या आणि अधिकाऱ्यांवरील कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्ष कारवाई कितपत यशस्वी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.