पुणे: अमितेश कुमार यांची मोठी कारवाई; पुणे वाहतूक विभागात मोठी खांदेपालट; ३० डीओंच्या तडकाफडकी बदल्या

0
Additional-Commissioner-of-Police-Manoj-Patil-ordered.jpg

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहर वाहतूक विभागातील ड्युटी ऑफिसर (डीओ) म्हणून काम पाहणाऱ्या 30 पोलिस कर्मचार्‍यांच्या तडकाफडकी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि. 20) रात्री अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले. बदल्यांनंतर बंडगार्डन व लष्कर वाहतूक विभागात संबंधित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे.

वाहतूक विभागातील ‘डीओगिरी’वर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विभागातील कार्यशैली अधिक पारदर्शक करण्यासाठी ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

डीओच्या खुर्चीसाठी रस्सीखेच
पोलिस ठाणे असो वा वाहतूक विभाग, डीओचे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विभागातील सर्व कार्यालयीन कामकाज, कर्तव्य वाटप, बंदोबस्त आखणी, टपाल व खटले यांचा आढावा घेण्याची जबाबदारी डीओवर असते. त्यामुळे अनेक कर्मचारी या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असतात. प्रभारी अधिकारीही आपल्या मर्जीतील व्यक्तीलाच या पदावर ठेवत असल्याची प्रथा दिसून आली आहे.

तक्रारी पोहचल्या आयुक्तांपर्यंत
गेल्या काही महिन्यांत डीओकडून मनमानी कारभार, निवडक कर्मचाऱ्यांनाच चांगले कर्तव्य देणे, इतरांवर दुजाभाव, तसेच परवाने देताना हेतुपुरस्सर निर्णय घेतल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या दालनापर्यंत पोहचल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्तांनी हे निर्णय घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

प्रशिक्षणानंतर कार्यशैलीत बदल
अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये सर्व वाहतूक पोलिसांना प्रशिक्षित करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असून, प्रभारी अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजात स्वतः लक्ष घालावे, यासाठी ही तात्पुरती पावले उचलण्यात आली आहेत.

टेम्पो-क्रेन कारवाईही रडारवर
वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागांना टेम्पो व क्रेन देण्यात आले आहेत. मात्र, या कारवाईतही हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई केवळ बदल्यापुरती मर्यादित नसून, वाहतूक विभागातील शिस्त आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी सुरू झालेली मोहीम असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed