येरवड्यात बेकायदा होर्डिंग्सचा सुळसुळाट; उपायुक्त ठोंबरे कारवाई करतील का?

Screenshot_2025-01-06-00-46-08-038-edit_com.android.chrome

येरवडा (प्रतिनिधी): पुणे शहरातील येरवडा, धानोरी, आणि कळस परिसरात बेकायदा जाहिरात फलकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या फलकांमुळे परिसराचे विद्रूपीकरण तर होत आहेच, शिवाय अपघातांचा धोका देखील वाढला आहे. राजीव गांधी रुग्णालय आणि कर्नल यंग शाळेजवळ लावलेले अनेक फलक अनधिकृत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या जाहिराती प्रशासनाच्या परवानगीने लावल्या आहेत का, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

या बेकायदा जाहिरात फलकांमागे काही आकाश चिन्ह निरीक्षकांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनातील काही लोकांच्या सहकार्याने हा गोरखधंदा जोरात सुरू आहे. यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत असून, या जाहिरातींची कोणतीही अधिकृत नोंद नसल्यामुळे अपघात झाल्यास जबाबदारी निश्चित करणे कठीण ठरते.

अपघाताची शक्यता आणि जबाबदारीचे प्रश्न
अनधिकृत जाहिरात फलकांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. उद्या जर कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? आकाश चिन्ह निरीक्षकांवर यासाठी कारवाई होईल का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शहरातील जाहिरात नियंत्रण विभागाचे उपायुक्त प्रकाश ठोंबरे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन बेकायदेशीर जाहिरात लावणाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्या आकाश चिन्ह निरीक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यापूर्वी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत.

नागरिकांची अपेक्षा
येरवडा आणि परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. जर प्रशासनाने योग्य ती कारवाई केली, तर शहराचे विद्रूपीकरण थांबण्याबरोबरच अपघातांचाही धोका टळेल. आता प्रकाश ठोंबरे आणि त्यांचे विभाग या समस्येवर कशा प्रकारे तोडगा काढणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

You may have missed