देहूरोड बाजारात खंडणी प्रकरण उघड! व्यापाऱ्यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; धिंड काढून जनतेत दहशत कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न

पिंपरी (प्रतिनिधी) : “तुम्हाला येथे धंदा करणे मुश्किल करून टाकीन, तसेच तुम्हाला कायमचे संपवून टाकीन” अशी धमकी देत व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने वर्गणी उकळणाऱ्या व्यक्तीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची देहूरोड बाजारपेठेत धिंड काढून जनतेत भीती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राजू उर्फ राजा मासलामनी पिल्ले (वय ३५, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत अमृतलाल कटारिया (वय ४७, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्ले याने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत नसलेल्या मंडळाच्या नावाने कोणतेही अधिकृत अधिकार नसताना बाजारातील व्यापाऱ्यांकडून वर्गणी मागण्यास सुरुवात केली होती. मेन बाजारपेठेतील दोन दुकानदारांकडून जबरदस्तीने पावती कापून प्रत्येकी हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र दुकाने एकच असल्याचे सांगून पाचशे रुपये दिल्यावरही पिल्ले याने धमकावून खंडणी उकळली.
या घटनेनंतर अरविंद कुंदनलालजी कटारिया यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. रविवारी (दि. १३) व्यापाऱ्यांनी व स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी लगेचच खंडणी व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करून पिल्ले याला अटक केली. त्यानंतर देहूरोड बाजारपेठ, ज्वेलर्स मार्केट आणि भाजी मंडई परिसरात त्याची धिंड काढण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, राजा पिल्ले याच्यावर यापूर्वीही हिंजवडी, देहूरोड व शिवाजीनगर पोलिस ठाण्यांमध्ये चार गुन्हे दाखल आहेत.
देहूरोड पोलिसांनी घेतलेल्या तत्पर कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून यापुढील काळात अशा प्रकारांना आळा बसविण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.