मैंदर्गी नगरपरिषदकडून दूषित पाणी पुरवठा, नागरिकांच्या तक्रारींना उत्तर देण्यात अपयश
मैंदर्गी: शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यादगार मोहल्ला, वार्ड क्रमांक 1 येथील मुस्लिम समुदायावर विशेषतः हा परिणाम होत असून, नागरिकांचे म्हणणे आहे की, नगरपरिषदेकडून तक्रारींना योग्य प्रतिसाद मिळत नाही आणि भेदभावाची भावना निर्माण झाली आहे.
नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी देऊनही समस्येवर योग्य तोडगा काढला जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी तक्रारींना फक्त खोटी आश्वासने देत असून, ठेकेदारांचे बिल मंजूर करण्यावरच लक्ष केंद्रीत करत आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे, मात्र नगरपरिषद यावर तातडीने उपाययोजना करण्यास कमी पडत आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठित करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, त्यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.