मुख्यमंत्र्यांचे आदेश फोल; पुण्यात फलकबाजीची मस्ती मस्तच! सिग्नल झाकले, चौक गच्च – पुण्यात शुभेच्छा फलकांचा कब्जा

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून पक्ष कार्यकर्त्यांना “बेकायदा फलक लावू नका” अशी सूचना दिली. पण साहेबांनी बोललेले आदेश कार्यकर्त्यांच्या कानात पोहोचायच्या आतच फलक उभे राहिले. कुठे मंदिराच्या प्रवेशद्वारावर, कुठे वाहतूक सिग्नलवर, तर कुठे चौकाच्या मधोमध – फलकबाजीचा जणू ‘महापूर’च शहरात सुरू आहे.
राजकीय शुभेच्छांचा एवढा उधाण आले आहे की पुण्याच्या चौकाचौकात “भावी नगरसेवक”, “संघटनात निवड झालेले पदाधिकारी”, “वाढदिवसाचे फलक” यांची झुंबड उडालेली दिसते. वाहतूक दिवे झाकले, पादचाऱ्यांची दाणादाण उडाली – पण याकडे पाहायला प्रशासनाकडे फुरसत नाही.
महापालिका प्रशासनाची भूमिका मात्र ‘तो फलक काढीन म्हणे, पण तोवर दुसरा उभा राहीन’ अशीच दिसते. उपायुक्त आकाशचिन्ह विभाग संतोष वारुळे सांगतात, “कारवाई केली जाईल, आढावा घेतला जाईल”. पण या कारवाईचा आढावा नागरिकांना अजून तरी दिसलेला नाही.
दरम्यान, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी टोला लगावला – “जे कार्यकर्ते अनधिकृत फलक लावतात त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारीच देऊ नये. राजकीय पक्षांकडे अशी हिंमत असेल तर ही फलकशाही आपोआप थांबेल.”
आता प्रश्न असा की, नेत्यांचे आदेश कागदावरच राहणार की प्रत्यक्षात राबवले जाणार? पुणेकरांना शुभेच्छांचा पाऊस थांबतो की अजून रंगीत ‘फलकशाही’ सहन करावी लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
—