पुणेकरांसाठी मोठी बातमी ! पालखींच्या आगमनानिमित्त उद्या वाहतुकीत बदल; कोणते रस्ते बंद?

पुणे : आषाढी एकादशीला आता काहीच दिवस उरले आहेत. विठूरायाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले वारकरी आता श्री संत महाराजांच्या पालख्यांसंगे पंढरपूरच्या वाटेवरून पायी चालू लागले आहेत. श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं रविवार दिनांक 30 जून रोजी पुण्यात आगमन होणार असून मुक्कामही असणार आहे. या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड इथून रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल होणं नियोजित आहे. त्यामुळे बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. तर, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, येरवड्यातील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहील. या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते बंद राहतील. तर इतर रस्ते सुरू असतील.
पाटील इस्टेट परिसरापासून दोन्ही पालख्या एकाच मार्गावरून मुक्कामस्थळी पोचतील. अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, वेधशाळा चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गोखले स्मारक चौक (गुडलक), खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलीस चौक इथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अरुणा चौकमार्गे नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. तर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौकमार्गे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर इथं मुक्कामास येईल. पालख्यांच्या मुक्कामानिमित्त नाना-भवानी पेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.