पुण्यात ड्रग्सविरोधी मोहीम गाजली! बिबवेवाडी, कोंढवा, बुधवार पेठेतून २६ लाखांचे ड्रग्स जप्त

0
13efdfb5-05ae-4757-98d1-55b70c5d74cb.jpeg

पुणे: पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत बिबवेवाडी, कोंढवा आणि बुधवार पेठ या भागांमधून एकूण २६ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये मेफेड्रोन आणि अफू यांचा समावेश असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

बिबवेवाडी परिसरात विठ्ठल ऊर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) याच्याकडून ११ लाख २ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. यासोबतच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व मोबाईल असा एकूण ११ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई आझीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कोंढवा भागात पोलिसांनी भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्यावर कारवाई करत १४ लाख ९८ हजार रुपयांची अफू, एक पिशवी, वजनकाटा असा १५ लाख ४२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बिष्णोई याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही दोन्ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे आणि राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रशांत अन्नछत्रे, नितीनकुमार नाईक व त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करत संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) याला अटक केली. त्याच्याकडून दोन ग्रॅम २४ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत ४५ हजार रुपये आहे. जैन याने हे अमली पदार्थ कोठून आणले व कोणाला विक्री करणार होता, यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

या तिन्ही कारवायांमुळे पुण्यात अमली पदार्थांचा विळखा रोखण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत सुरू आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed