जालना येथे अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध; ओबीसी आंदोलक संतप्त; मंत्रिमंडळात न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा – व्हिडिओ
मुंबई, दि. 17 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर राज्यात स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन झाले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, ज्यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.
या विस्तारात भाजपचे 19, शिवसेना (शिंदे गट) चे 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांचा समावेश झाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची संख्या 42 वर पोहोचली आहे. मात्र, मंत्रिमंडळातील एक जागा अद्याप रिक्त असून, या विस्तारामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
पहा व्हिडिओ
छगन भुजबळ समर्थक आक्रमक; जोडे मारो आंदोलन
मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. जालना येथे भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून गांधी चमन येथे त्यांनी “जोडे मारो आंदोलन” केले. या वेळी आंदोलकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली आणि मंत्रिमंडळात भुजबळ यांना संधी न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
भुजबळांचा नाशिककडे कूच; समर्थक मेळाव्याची तयारी
दरम्यान, छगन भुजबळ मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज होत नागपूर येथून नाशिककडे रवाना झाले आहेत. उद्या भुजबळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असून त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. तसेच दोन दिवसांत भुजबळ समर्थकांचा मेळावा होण्याची शक्यता आहे.
“माझ्या संघर्षाचं बक्षीस” – छगन भुजबळ
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत, “जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मला मिळालं,” असे स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. तसेच भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवले जाईल, अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी अधिक उफाळून आली असून, पुढील काही दिवसांत ही परिस्थिती कोणत्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.