पुण्यात दहशत पसरवणाऱ्या दोन गुंड टोळ्यांवर कारवाई: टिपू पठाण आणि फिरोज शेख टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

पुणे – हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हडपसरमधील सय्यदनगर भागात सक्रिय असलेल्या टिपू पठाण टोळीवर आणि लोणी काळभोरमधील एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.
हडपसरमधील दहशतवाद्यांवर घणाघात
रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण (वय ३४, रा. सय्यदनगर, महंमदवाडी) आणि त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या टोळीमध्ये इजाज सत्तार पठाण (३९), नदीम बाबर खान (४१), सद्दाम सलीम पठाण (२९), एजाज यूसुफ इनामदार-पटेल (३३), इरफान नासिर शेख (२६), आणि साजीद झिब्राईल नदाफ (२५) यांचा समावेश आहे.
टिपू पठाण हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जमीन बळकावणे, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने स्वतःची टोळी तयार करून सय्यदनगर परिसरात दहशत निर्माण केली होती. बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, दरोडा, खंडणीखोरी आणि अंमली पदार्थांची विक्री या गुन्ह्यांतून त्याच्या टोळीने परिसरात भीती निर्माण केली होती.
विशेष म्हणजे, टिपू पठाणने एका महिलेला धमकावून तिची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच एका कार्यक्रमात नोटांची उधळण करताना त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात कठोर पावले उचलत सार्वजनिकपणे धिंड काढली होती.
लोणी काळभोरमध्येही गुन्हेगारी टोळीवर ‘मोक्का’
दुसरीकडे, लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या फिरोज महमंद शेख (२९), प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (२०), अस्लम अन्वर शेख (२०), आणि आदित्य प्रल्हाद काळाणे या चौघांवरही ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर टोळके जमवून दहशत निर्माण करणे, घातक शस्त्रांचा वापर, गंभीर मारहाण आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.
मागील चार महिन्यांमध्ये परिमंडळ पाचमध्ये एकूण सहा गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी शहरात गुन्हेगारी पायमोड करण्यासाठी केलेले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.