कारवाई होते, अड्डे पुन्हा सुरू; अमली पदार्थांसह मटका-जुगाराचा सुळसुळाट; अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे गंभीर वास्तव
पुणे, ता. ४ : पुणे शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि मटका-जुगाराच्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून सातत्याने कारवाया केल्या जात असल्या, तरी या अवैध धंद्यांना आळा बसताना दिसत नाही. शहराच्या विविध भागांत गांजा तस्करी, मटका आणि तीन पत्ती जुगाराचे अड्डे सुरूच असल्याने पोलिसांच्या कारवाईनंतरही हे धंदे पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, अमली पदार्थांच्या तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचेही गंभीर वास्तव समोर आले आहे.
अल्पवयीन मुलाकडून दीड किलो गांजा जप्त
कोंढव्यातील एका सोसायटीजवळील मैदानात अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत १६ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून तब्बल दीड किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अल्पवयीन मुलांचा वापर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत असून, या मागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
एनआयबीएम रस्त्यावर एका तरुणाकडून १६० ग्रॅम, येरवडा येथील पीएमपी बसथांब्यावरून दोघांकडून ३३२ ग्रॅम, अरण्येश्वर-पर्वती परिसरातून ३६४ ग्रॅम तसेच शेवाळेवाडी येथे एका १९ वर्षीय तरुणाकडून गांजा जप्त करण्यात आला.
कॅम्प, स्वारगेट आणि खडकी परिसरात सिगारेट व चिलीममधून गांजा ओढणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विमाननगर परिसरात ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले. त्यामुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध वापराचे आणि विक्रीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा अंदाज येत आहे.
मटका-जुगाराचे अड्डेही बिनधास्त
एकीकडे अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे कल्याण, पणती-पाकोळी मटका आणि तीन पत्ती जुगाराचे अड्डे शहरातील विविध भागांत सुरू असल्याचे समोर आले आहे. येवलेवाडी येथे कल्याण तसेच पणती-पाकोळी मटका चालविणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे कोंढवा, खडकी, विश्रांतवाडी आणि लक्ष्मीनगर परिसरात मटक्याच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली.
रामोशी गेट, मंगळवार पेठ आणि कोरेगाव पार्क परिसरात तीन पत्ती जुगाराच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
कारवाईनंतरही अड्डे पुन्हा सुरू
पोलिसांकडून छापे टाकून गुन्हे दाखल केले जात असले, तरी काही ठिकाणी कारवाईनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अवैध धंदे सुरू होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केवळ अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई करण्यापेक्षा या धंद्यांमागील सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि स्थानिक पातळीवरील मदतनीसांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
विशेषतः अमली पदार्थांच्या व्यवहारात अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याने हा प्रकार अधिक गंभीर बनला आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयीन परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांची उपलब्धता रोखण्यासाठी पोलिसांनी तस्करीच्या संपूर्ण साखळीवर प्रहार करण्याची आवश्यकता आहे.
पोलिसांची कारवाई सुरू; पण अवैध धंदे थांबणार कधी?
अमली पदार्थ तस्करी आणि जुगाराविरोधातील कारवायांनंतरही संबंधित अड्डे पुन्हा सुरू होत असतील, तर कारवाईचा धाक नेमका कुणाला आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.