तक्रारीकडे कानाडोळा; दलालांना मोकळे रान?
बांगलादेशी पीडितेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष; महिला हवालदार निलंबित

0
IMG_20260209_105551.jpg

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) – बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतून मदतीचा हात मागणाऱ्या बांगलादेशी तरुणीच्या आक्रोशाकडे कानाडोळा केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला हवालदार मनीषा पुकाळे यांना अखेर निलंबनाची कारवाई भोगावी लागली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी हा आदेश दिला आहे. मात्र या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

रात्रगस्तीदरम्यान एका तरुणीने आपण बांगलादेशी नागरिक असून जबरदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची स्पष्ट माहिती दिली. अपेक्षा होती ती कायदेशीर मदतीची; पण मिळाला तो संशयास्पद “तडजोडीचा” मार्ग! पीडितेला शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेऊन संबंधित कुंटणखान्याच्या मालकीणीला बोलावण्यात आले आणि चर्चेनंतर तिलाच पुन्हा तिच्या ताब्यात देण्यात आल्याची नोंद अहवालात आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच पीडितेला पुन्हा छळाच्या खाईत ढकलल्याची ही गंभीर बाब ठरते.

दरम्यान, संबंधित तरुणीला २०२३ मध्ये अल्पवयीन असताना दलालामार्फत बेकायदा देशात आणण्यात आले होते. कोलकात्यातून पुण्याच्या बुधवार पेठेत विक्री; किंमत पाच लाख रुपये! आणि त्यानंतर “दहा लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही” अशी धमकी. शारीरिक-मानसिक छळ, जबरदस्ती आणि भीतीच्या सावटाखाली ती जगत होती. अखेर मित्राच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधताच तिची सुटका झाली.

प्रश्न मात्र अनुत्तरितच – जर पहिल्याच वेळी तक्रारीची गंभीर दखल घेतली असती, तर हा छळ थांबला असता का? महिला सुरक्षेच्या घोषणा आणि वास्तवातील कृती यात इतकी दरी का? निलंबन ही कारवाई पुरेशी ठरणार का, की या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारीची साखळी उघड होणार?

बुधवार पेठेतील मानवी तस्करीचा प्रश्न नवीन नाही. मात्र प्रत्येक वेळी कारवाईनंतर काही दिवस गाजावाजा आणि नंतर पुन्हा जुनेच चित्र – अशीच पुनरावृत्ती होत राहणार का, हा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed