पुणे: माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा; ‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देण्याच्या आमिषाने डॉक्टरची २४ लाखांची फसवणूक
पुणे : सार्वजनिक सेवा सुविधांसाठी राखीव असलेली ‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून हडपसरमधील महंमदवाडी परिसरातील एका डॉक्टरांची तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेविकेसह तिच्या पतीसह चौघांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद डॉ. महेंद्र धोंडीराम सुरवसे (वय ३९, रा. महंमदवाडी) यांनी दिली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या काळात ही फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
“दैनिक लोकसत्ता” ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. सुरवसे यांचे महंमदवाडी येथे रुग्णालय आहे. आरोपींनी त्यांना ॲमेनिटी स्पेस मिळवून देण्याचे आणि महानगरपालिकेकडून परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी २५ लाख रुपयांची मागणी केली. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून डॉ. सुरवसे यांनी पत्नीच्या आणि मित्राच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. मात्र, ठरलेली जागा मिळाली नाही आणि अखेर त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, फसवणुकीच्या या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेविका पूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.