लाडक्या बहिणींना बिनव्याजी १ लाखाचे कर्ज; १ कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प

मुंबई : राज्यातील गोरगरिब महिलांसाठी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींना आता बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातून महिला उद्योग-व्यवसाय उभारून स्वावलंबी होऊ शकतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची माहिती देताना राज्यातील १ कोटी लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपयांवर अवलंबून रहावे लागू नये. प्रत्येक गावात महिला बचत गटांच्या माध्यमातून पतसंस्था स्थापन करून जिल्हा बँकेमार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरु करण्यात आले आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती झाली. २५ कोटी लोक गरिबीरेषेखालून वर आले तर १५ कोटी लोकांना स्वतःचे घर मिळाले. महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय विकसित भारत शक्य नाही, हे पंतप्रधान सतत अधोरेखित करतात.”
गेल्या वर्षी राज्यात २५ लाख भगिनी ‘लखपती दीदी’ झाल्या असून देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षीही तितक्याच महिलांना आर्थिक बळ देण्यात येणार असून, पुढील काळात एक कोटी लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ करण्याचे ध्येय सरकारने ठरवले आहे.
थोडक्यात:
लाडक्या बहिणींना जिल्हा बँकेमार्फत बिनव्याजी १ लाखाचे कर्ज
प्रत्येक गावात महिला पतसंस्था स्थापन होणार
राज्यातील १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट
मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘समृद्ध पंचायतराज अभियान’चा शुभारंभ
—