स्वस्त धान्य दुकानांमध्ये गोंधळ: डिसेंबरचे धान्य वाटप अद्याप अपूर्ण; धान्य उशिरा पोहोचल्याने वाटपात विलंब; विजयकुमार क्षीरसागर परिमंडल अधिकारी

पिंपरी-चिंचवड: शहरातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये डिसेंबर महिन्याचे धान्य उशिरा पोहोचल्याने त्याचे वाटप जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आले. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊन आणि ई-पॉस मशिनच्या बिघाडामुळे वाटप प्रक्रियेला व्यत्यय येत आहे. परिणामी, अद्याप सर्व ठिकाणी धान्य वाटप पूर्ण झाले नसल्याच्या तक्रारी आहेत.
दिवसांमध्ये वाढ, तरीही वाटप रखडले
अन्नसुरक्षा आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शहरातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ दिला जातो. मात्र, डिसेंबर महिन्यात १४ ते १८ तारखेदरम्यानच काही ठिकाणी गहू आणि तांदूळ पोहोचले होते. अनेक दुकानांमध्ये गहू महिन्याच्या अखेरीस मिळाला. त्यामुळे धान्य वाटप उशिरा सुरू झाले. ३१ डिसेंबरपर्यंत वाटप सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ दिली गेली होती. तरीही काही दुकानांमध्ये वाटप अद्याप सुरू आहे.
सर्व्हर डाऊन आणि मशिनचा बिघाड ठरला प्रमुख अडथळा
शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशिन बसविण्यात आले आहेत. मात्र, वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे वाटप प्रक्रिया खोळंबली आहे. दुकानदारांच्या मते, या तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थींना वेळेत धान्य देता आले नाही.
जानेवारीचे धान्य वाटपही रखडले
डिसेंबरचे शिल्लक धान्य वाटप जानेवारीच्या १ आणि २ तारखेला करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी अद्याप डिसेंबरचे वाटप सुरू असून जानेवारी महिन्याचे धान्य अद्याप दुकानांमध्ये पोहोचलेले नाही.
“धान्य उशिरा पोहोचल्याने वाटपात विलंब झाला. मात्र, आता बहुतांश ठिकाणी वाटप पूर्ण झाले आहे. काही दुकानांमध्ये जानेवारीचे धान्य आले असून लवकरच त्याचे वाटप केले जाईल,” असे परिमंडल अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी सांगितले.
या प्रक्रियेत होणाऱ्या वारंवारच्या तांत्रिक अडचणी आणि नियोजनाच्या त्रुटींमुळे लाभार्थींना त्रास सहन करावा लागत आहे.