पुणे: हडपसरमधील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलवर फसवणुकीचा आरोप; पुण्यातील पालकांना सावधान! शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी खात्री करा
पुणे – शहर आणि उपनगरांमध्ये सध्या शाळांच्या प्रवेशासाठी जाहिरातींचा सुकाळ दिसून येत आहे. मोठमोठे फ्लेक्स आणि आकर्षक जाहिरातींनी पालकांचे लक्ष वेधले जात आहे. मात्र, यामुळे पालकांची फसवणूक होण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
हडपसर परिसरातील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलमधील फसवणुकीचा प्रकार नुकताच शिक्षण विभागाच्या लक्षात आला आहे. शाळेचा ‘यू-डायस नंबर’ चुकीचा असल्याचे पालकांनी उघड केले. या प्रकरणी शिक्षण विभागाने तातडीने दखल घेत, शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
शाळांच्या प्रवेश जाहिरातींमागील वास्तव
शहरात ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’, ‘आयबी’, तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेचे सत्र सुरू आहे. मात्र, अनेक शाळा परवानगीविना जाहिराती करत असून पालकांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रवेशापूर्वी काय काळजी घ्याल?
पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी शाळेबाबत खालील गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे:
शाळेला सरकारी मान्यता आहे का?
यू-डायस नंबर वैध आहे का?
शाळेत भौतिक सुविधा, स्वच्छतागृहे आणि खेळाचे मैदान आहे का?
शाळेत सुरक्षा व्यवस्थेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत का?
पालक-शिक्षक समितीची स्थापना झाली आहे का?
विद्यार्थ्यांच्या वाहन व्यवस्थेमध्ये महिला कर्मचारी आहेत का?
फसवणूक झाल्यास कारवाई
पालकांची फसवणूक झाल्यास शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे. यासोबतच, गटशिक्षणाधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांवर बारकाईने लक्ष ठेवून काम करतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
पालकांसाठी विशेष यादी उपलब्ध
अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने १६ ते १८ डिसेंबरदरम्यान www.zppune.org या संकेतस्थळावर शाळांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे.
पालकांना सावधगिरीचा सल्ला
जिल्हा परिषदेच्या वतीने पालकांना आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी फसवणूक करणाऱ्या शाळांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळा निवडताना योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील त्रास टाळता येईल.