पुणे: “विद्यार्थ्यांना उद्यापासून दिवाळी सुट्टीची सुरुवात; १५ दिवसांची विश्रांती, शाळा ११ नोव्हेंबरला”
पुणे: पहिल्या सत्राची परीक्षा शनिवारी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीची १५ दिवसांची सुट्टी लागणार आहे. काही शाळांचे परीक्षांचे काम शुक्रवारी पूर्ण झाले, तर बहुतेक शाळांचे परीक्षांचे काम आज (शनिवारी) संपणार आहे. त्यानंतर चिमुकल्यांना मामाच्या गावाला जाण्यासाठीची उत्सुकता लागली आहे. सुट्या संपल्यावर ११ नोव्हेंबरला शाळा पुन्हा सुरु होतील व दुसऱ्या सत्राचे अध्यापन सुरू होईल.
यंदाच्या दिवाळी सुट्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी चालू असून, शिक्षकांसह एकूण १९ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची निवडणूक ड्यूटी निश्चित करण्यात आली आहे. त्यांचे पहिले तालुकानिहाय प्रशिक्षण रविवारी होणार आहे. यामुळे काही शिक्षकांना दिवाळीत निवडणूक कामे देखील करावी लागतील.
दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होईल तर त्यांचे प्रात्यक्षिक २४ जानेवारीपासून घेतले जाणार आहे. दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून होणार असून त्यांचे प्रात्यक्षिक-तोंडी परीक्षा ३ फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीतच बोर्डाच्या परीक्षांची तयारी करावी लागणार आहे.
एसटी प्रवाशांना दिलासा; दिवाळीत भाडेवाढ नाही
दिवाळीच्या प्रवासात एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा देत भाडेवाढ होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास पूर्वीच्या दरातच करता येणार आहे. ‘महिला सन्मान योजना’अंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठांना १०० टक्के आणि इतर ज्येष्ठांना ५० टक्के सवलत मिळणार आहे.
सोलापूर विभागाने दिवाळीच्या हंगामात विशेष बस सेवा सुरू केली आहे. स्वारगेट, पुणे येथून सोलापूरसह विविध मार्गांवर ३३७ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये स्वारगेट ते पुणे मार्गावर दिवाळीपूर्वी विविध तारखांना ५०, ४०, ७५ आणि ८० बस सोडण्यात येणार आहेत. सोलापूर-लातूर, पंढरपूर-परळी, अकलूज-लातूर, सांगोला-अहिल्यानगर यांसारख्या मार्गांवर देखील अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.