“शाळेच्या फीमध्ये ८४०० रुपये पॅरेंट्स ओरीएंटेशनचे, पालकांची तीव्र प्रतिक्रिया”
महागाईच्या वाढत्या दरांसोबत शिक्षणाचा खर्चही प्रचंड वाढत आहे. शाळांची फी पालकांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. अगदी नर्सरीसाठी प्रवेश घेतानाही हजारो रुपये फी भरावी लागत असल्यामुळे पालक अडचणीत सापडले आहेत.
इतकी महागडी फी आकारली जात असताना, नक्की काय शिकवले जाते, हा प्रश्न अनेक पालक विचारताना दिसतात. नुकत्याच सोशल मीडियावर एका शाळेच्या फी स्ट्रक्चरची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये नर्सरीचे फी जवळपास दीड लाख असल्याचे दिसून येते.
कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. जगदिश चतुर्वेदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ज्युनियर केजीच्या फीचे तपशील शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये फीचे सविस्तर वर्णन दिले असून, मूळ फी फक्त ५५,६३८ रुपये आहे. त्याशिवाय रिफंडेबल फी ३०,०१९ रुपये, वार्षिक शुल्क २८,३१४ रुपये, डेव्हलपमेंटल फी १३,९४८ रुपये, आणि ट्यूशन फी २३,७३७ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व शुल्कांसोबत पालकांच्या ओरीएंटेशनसाठी ८,४०० रुपये आकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकूण फी १ लाख ५१ हजार ६५६ रुपये होते.
डॉ. चतुर्वेदी यांनी हे फी स्ट्रक्चर ट्विटरवर शेअर केल्यावर अनेक पालकांनी प्रतिक्रिया दिल्या. पालकांच्या ओरीएंटेशनसाठी लावण्यात येणारी २०% फी देण्यासाठी कोणीही तयार होणार नाही, असे डॉक्टर म्हणाले आहेत. मजेत त्यांनी आता शाळा उघडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. ही पोस्ट ९६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली असून जवळपास ३८० लोकांनी ती रीपोस्ट केली आहे. पालकांचा मुलांच्या फीबाबत नाराजीचा सूर आणि त्यावर होणारा खर्च हा सध्या महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.