पुणेकरांनो सावधान! रोज रात्री 11 ते पहाटे 3 पर्यंत नाकाबंदी, मद्यपींवर होणार कठोर कारवाई,
पुणे – पुणे पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शहरात दररोज रात्री 11 ते पहाटे 3 या वेळेत नाकाबंदी केली जाणार असून, विशेषत: मद्यपी वाहनचालकांवर कारवाई होणार आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी 27 ठिकाणे निश्चित केली असून, सहायक पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली सव्वाशेहून अधिक पोलिसांचा सहभाग असणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली असून, नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने या मोहिमेला सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरु झाली आहे, ज्याअंतर्गत दोषी वाहनचालकांचे वाहन सहा महिन्यांसाठी जप्त केले जाईल.
बेशिस्त वाहनचालकांसाठी कठोर पावले
नाकाबंदी मोहिमेअंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसह, ट्रीपल सीट प्रवास, सिग्नल तोडणे आणि इतर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाविरुद्धही कठोर पावले उचलली जाणार आहेत. याशिवाय, पोलिसांनी मागील 15 दिवसांत 25,000 वाहनचालकांवर कारवाई केली असून 200 हून अधिक वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांचा ताबा संबंधित वाहनचालकांना सहा महिन्यांनंतर म्हणजेच मार्च किंवा एप्रिलमध्ये मिळणार आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी 850 पोलीस रस्त्यावर
शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी पुणे पोलिसांकडून दोन शिफ्टमध्ये 850 पोलिसांची तुकडी तैनात आहे. वारंवार होणारे नियम उल्लंघन लक्षात घेता पोलिसांनी आता अधिक कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.