पुणे: दोन लाखांच्या लाच प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि फौजदार निलंबित
पुणे – फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांच्यावर ही कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बहिरट हे गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये कार्यरत असताना, फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराला सहआरोपी न करण्यासाठी क्षीरसागर यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर दोन लाख रुपयांवर हे देय ठरविण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर, तपासात क्षीरसागर यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे उघड झाले. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बहिरट यांनी तक्रारदाराच्या संशयास्पद हालचालीमुळे त्याच्याकडील व्हाईस रेकॉर्डर काढून घेतल्यामुळे सापळा यशस्वी झाला नाही.
तथापि, लाच मागणीचे आरोप सिद्ध झाल्याने क्षीरसागर यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिरट यांच्या सहभागाविषयी सखोल तपास सुरू असून, दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने निलंबित करण्यात आले आहे.