पुणे: आरोप गंभीर, चौकशी थांबली पण पदोन्नती झाली: श्री. पाटील निवृत्तीच्या उंबरठ्यावर – व्हिडिओ
मुंबई, 18 सप्टेंबर 2024 – महाराष्ट्र राज्य कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी श्री. विकास षण्मुख पाटील यांच्यावर अनेक गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. पाटील, सध्या राज्याच्या निविष्ठा व गुननियंत्रण संचालक म्हणून कार्यरत असलेले, २०१२-२०१३ मध्ये सातारा जिल्ह्यातील वैरण विकास कार्यक्रमात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत.
कृषी विभागाच्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, श्री. पाटील यांनी मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून शासनाला ३५.४४ लाख रुपयांचे नुकसान पोहोचविले. याबाबत सादर केलेल्या चौकशी अहवालानंतरही त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच, विविध मंत्रालयीन अधिकारी आणि कृषी विभागातील उच्च अधिकाऱ्यांनी तपास दडपण्याचे प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत.
IWMP योजनेतील गैरव्यवहार
पाटील यांनी २०१०-२०१३ दरम्यान एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ८.५० कोटी रुपयांची खरेदी ई-निविदा न करता केल्याचे समोर आले आहे. पाणलोट समितीच्या अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या खोट्या वापरून अंदाजे ३.२७ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील तपास अहवाल दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही निदर्शनास आले आहे.
चौकशी आणि पदोन्नती
पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराची तक्रारी दाखल असूनही त्यांना दोन वेळा पदोन्नती देण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयातील अनेक अधिकारी या प्रकरणात संलिप्त असल्याचे आरोप आहेत. तसेच, बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सीबीआय किंवा ईडी तपासाची मागणी
पाटील यांच्या विरोधातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआय किंवा ईडी सारख्या केंद्रीय संस्थांच्या तपासाची मागणी होत आहे. श्री. पाटील हे ३० सप्टेंबर २०२४ रोजी निवृत्त होणार असल्याने, त्यांच्याकडून शासनाची प्रलंबित रक्कम वसूल करण्याचीही मागणी होत आहे.
आयुक्तांच्या तपासाची मागणी
तत्कालीन कृषी आयुक्तांनी प्रस्तावित केलेल्या चौकशीसह, भ्रष्टाचारात सहभागी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.