पुणे: गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही शिधावाटप बंद, वाचा सविस्तर
पुणे: राज्य सरकारने गणपती सणासाठी आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही अद्याप शिधावाटप सुरू न झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. शिधावाटप पुढील आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती अन्नधान्य वितरण कार्यालयाने दिली आहे.
राज्य सरकारने १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेल अशा चार वस्तूंचा समावेश आहे. हा संच केवळ १०० रुपयांमध्ये दिला जात असून, सुमारे ८ लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
परंतु, काही परिमंडळांमध्ये अद्याप सर्व वस्तू पोहोचलेल्या नाहीत. काही ठिकाणी केवळ तेल आणि साखर उपलब्ध असून, पूर्ण संच येईपर्यंत वाटप सुरू केले जाणार नाही, असे रेशन दुकानदार संघटनेने सांगितले. अन्नधान्य पुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की येत्या आठवड्याभरात सर्व वस्तू पोहोचवल्या जातील आणि शिधावाटप सुरू होईल.
दरम्यान, नियमित धान्य वाटपही अडचणीत आले असून, गव्हाचे वितरण काही ठिकाणी झाले असले तरी तांदूळ अद्याप पोहोचलेला नाही.