२५ लाख लाच प्रकरण: भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, या अधिकाऱ्यांविरोधात अन्य नागरिकांच्याही तक्रारी असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करायचे आवाहन

saamtv_2021-06_cf605e71-491c-47ec-8666-63e2fa5937a3_Saam_Banner_Template__75_.jpg

पुणे : हडपसर येथील जमिनीच्या मोजणीप्रकरणात २५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकर मापक किरण येटाळे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांविरोधात फौजदारी स्वरुपाच्या अन्य तक्रारी असतील तर नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

सदर प्रकरणात पाटील आणि येटाळे यांनी जमिनीची मोजणी केल्यानंतर जमिनीचा ‘क प्रत’ देण्यासाठी थेट २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. जमीन मालकाने लाच देण्यास नकार दिल्यानंतर या अधिकाऱ्यांनी मुद्दाम चुकीची क प्रत तयार करून मालकाचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जमीन मालक कुणाल अष्टेकर यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. यानंतर तातडीने कारवाई करत अमरसिंह पाटील आणि किरण येटाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना निलंबितही करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले की, या अधिकाऱ्यांविरोधात अन्य नागरिकांच्याही तक्रारी असल्यास त्यांनी पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा.

Spread the love

You may have missed