शालेय बस सुरक्षा: बस ऑडिट आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या – आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे, ता. १७ : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसचे त्वरित ऑडिट करण्यात यावे तसेच शालेय कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक प्रशिक्षण देण्याचे निर्देश सरकारने महापालिकांना द्यावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली.
औचित्याचा मुद्दा उपस्थित करत शिरोळे यांनी पुण्यातील शालेय बसचा विषय अधिवेशनात मांडला. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या बसला अचानक आग लागली होती. या घटनेने शालेय बस आणि व्हॅनच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
पुण्यात सध्या आठ हजारांहून अधिक शालेय बस आणि व्हॅन वाहतूक करतात. या सर्व वाहनांचे त्वरित ऑडिट करून सुरक्षा उपाय तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, पुणे महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून शालेय कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक प्रशिक्षण दिले जावे.
बसमध्ये आग आटोक्यात आणणारी यंत्रणा (फायर सेफ्टी इक्विपमेंट) कुठे बसवली जावी, ती कशी वापरावी, आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे, याचेही प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिरोळे यांनी सरकारकडे केली.
शालेय बसच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत आणि विद्यार्थ्यांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी आग्रही भूमिका शिरोळे यांनी विधिमंडळात मांडली.