मुंढव्यात बेकायदा गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; तिघांवर गुन्हा; घरगुती सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरणा; आग आणि स्फोटाचा धोका
पुणे : घरगुती गॅस सिलिंडरमधून पाइपच्या साहाय्याने गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून विनापरवाना विक्री करण्याचा प्रकार मुंढवा गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या बेकायदा प्रकारामुळे गॅसगळती, आग आणि स्फोटाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भूपेंद्रप्रताप सुंदर सिंह (वय ३८), मानकराम सुखराम सियाक (वय ३९) आणि महेंद्र बाबूराम खिचड (वय १९) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी भरलेल्या घरगुती गॅस सिलिंडरमधून पाइपच्या साहाय्याने गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. या कामासाठी संबंधित विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच गॅस हाताळताना आवश्यक सुरक्षा उपाययोजनाही करण्यात आल्या नव्हत्या.
७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर केलेल्या तपासणीत विनापरवाना गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले. गॅसच्या अशा असुरक्षित हाताळणीमुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो.
पोलीस कर्मचारी एकता बाबूराव साळुंके यांच्या तक्रारीवरून मुंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
बेकायदा रिफिलिंगवर पोलिसांची नजर
शहरात घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदा रिफिलिंग करून त्याची विक्री करण्याच्या प्रकारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारे विनापरवाना गॅस रिफिलिंग होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी केले आहे. शहरातील गॅस वितरकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.