एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; येरवडा पोलिसांकडून ठगाला अटक
पुणे, दि. १२ वैद्यकीय अभ्यासक्रमास (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका ठगाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. तपासात आरोपीने आतापर्यंत सुमारे ४० विद्यार्थी व त्यांच्या पालकांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून त्याच्याविरुद्ध हैदराबाद आणि मुंबई येथे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्यकुमार ऊर्फ अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) असे आहे. एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका पालकाकडून तब्बल ८ लाख १२ हजार रुपये उकळल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध १८ मार्च रोजी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान आरोपीला मुंबई पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक करून ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवले असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर येरवडा पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवत त्याचा या प्रकरणातील सहभाग निश्चित केला.
पुणे-मुंबईत शाखा, सोशल मीडियावर जाहिराती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या साथीदाराने हैदराबाद येथे ‘एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि.’ या नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या पुणे आणि मुंबई येथेही शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मार्गदर्शन व प्रवेश मिळवून देण्याच्या जाहिराती प्रसारित केल्या जात होत्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी पाच लाख रुपये, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी तीन लाख रुपये शुल्क आकारले जात होते. तसेच प्रवेश मिळाला नाही तर संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असे आश्वासनही विद्यार्थी आणि पालकांना दिले जात होते.
४० विद्यार्थी व पालकांची फसवणूक
प्राथमिक तपासात आरोपीने अशाच प्रकारे सुमारे ४० विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आणखी काही तक्रारी समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
येरवडा पोलिस आरोपीच्या आर्थिक व्यवहारांची तसेच त्याच्या कंपनीमार्फत झालेल्या इतर व्यवहारांची चौकशी करत आहेत. फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.