येरवडा: मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेत निराधार योजनेच्या लाभार्थ्याला अपमानास्पद वागणूक; ज्येष्ठ महिलेची तक्रार थेट रिझर्व्ह बँकेपर्यंत” – वाचा सविस्तर

पुणे, दि. ३१ मे २०२५: येरवडा येथील मुस्लिम को-ऑपरेटिव बँक शाखेत संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थी असलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने, पद्मिनी वालेकर यांनी, बँकेच्या मुख्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली असून, याबाबत संजय गांधी निराधार योजना विभाग, उपजिल्हाधिकारी कार्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सामाजिक माध्यमांवरही आवाज उठवला आहे.
पद्मिनी वालेकर, एक अशिक्षित आणि निराधार ज्येष्ठ महिला, यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना येरवडा शाखेत खाते उघडण्यासाठी आणि पेन्शनच्या चौकशीसाठी गेल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या आधार कार्डावर संपूर्ण जन्मतारीख नसल्याने सुरुवातीला खाते उघडण्यास अडथळे आले. सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने खाते उघडल्यानंतरही त्यांना बँक कर्मचाऱ्याकडून अपमानजनक वागणूक मिळाली. एका महिला कर्मचाऱ्याने त्यांना थेटपणे सांगितले, “तुम्ही इथे वारंवार येऊ नका, तुमचे खाते बंद करा, पेन्शन महाराष्ट्र बँकेत जमा होईल, आम्हाला त्रास देऊ नका.” या शब्दांनी वालेकर यांचा आत्मसन्मान दुखावला गेला.
वालेकर यांनी याबाबत शाखा व्यवस्थापकांकडे तक्रार केली, परंतु व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेत त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. वालेकर यांनी आपल्या तक्रारीत असेही नमूद केले की, अनेक ज्येष्ठ नागरिक आणि निराधार लाभार्थ्यांना या शाखेत अशाच प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे.
या प्रकरणी वालेकर यांनी बँकेला तीन मागण्या केल्या आहेत:
१. संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई किंवा बदली करावी.
२. शाखा व्यवस्थापकांना लाभार्थ्यांशी संवेदनशीलपणे वागण्याचे प्रशिक्षण द्यावे.
३. भविष्यात कोणत्याही निराधार लाभार्थ्याला अशी वागणूक मिळणार नाही, याची खात्री करावी.
“मी अशिक्षित आहे, पण माझ्या हक्कासाठी लढत आहे. माझ्यासारख्या अनेक निराधारांना न्याय मिळावा, ही माझी मागणी आहे,” असे वालेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार बँकेच्या सेवेतील संवेदनशीलतेच्या अभावाचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. याबाबत मुस्लिम बँकेचे अध्यक्ष पी.ए इनामदार साहेब व बँक प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.