“आमचं लग्न होईना, मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना” – डीजेवर धमाल गाणं, सोशल मीडियावर व्हायरल!
महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना चर्चेत, तरुणांनी मुख्यमंत्र्यांना गाण्याद्वारे विनंती
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळणार आहेत. राज्यभरातून कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक महिलांना सन्मान निधी प्राप्त झाला आहे.
या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे, मात्र दुसरीकडे पुरुष वर्गात नाराजी आहे. “आमच्यासाठी काही योजना नाही का?” असा प्रश्न विचारत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे. विशेष म्हणजे, काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांना गाण्यातूनच विनंती केली आहे. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
गाण्याचे बोल आहेत, “आमचं लग्न होईना, कुणी पोरगी देईना, हाताला काम नाही, मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना.” या गाण्यावर तरुणांनी डीजेवर नाचत असलेल्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून, यामुळे ही चर्चा अधिक रंगली आहे. इन्स्टाग्रामवर rubabwala_551 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
योजनेसाठी अर्ज केलेल्या अनेक महिलांना अजूनही निधी मिळालेला नाही. त्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले आहे का याची खात्री करावी, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.