पुणे विसर्जन मिरवणुकीत नियमांचा भंग; डीजेचा आवाज आणि लेसर वापरावर होणार कारवाई
पुणे, दि. १८ (प्रतिनिधी): पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाही नियमांचे उल्लंघन होताना दिसले. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही मंडळांनी मोठ्या आवाजात डीजे वाजवले आणि डोळ्याला त्रासदायक लेसर लाइट्सचा वापर केला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या मंडळांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक सुमारे २८ तास शांततेत पार पडली, अशी माहिती आयुक्तांनी दिली. त्यांनी सांगितले की, मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते आणि कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय मिरवणूक पार पडली. मात्र, लेसर लाइट्सच्या वापरावर बंदी असतानाही काही मंडळांनी याचा वापर केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ध्वनी मर्यादेबाबतही नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
कुमार यांनी सांगितले की, विसर्जनादरम्यान महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. काही घटनांची नोंद झाली असली तरी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी पुणेकरांसह बाहेरून आलेल्या गणेश भक्तांचेही आभार मानले.
मध्यरात्रीनंतर डीजेचा आवाज कमी झाला, मात्र पारंपारिक ढोलताशांच्या गजरात तरुणाईने ठेका धरला. लक्ष्मी रस्त्यावर तरुणांची प्रचंड गर्दी दिसून आली, ज्यात किशोरवयीन मुलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.